ऑनलाईन मार्केटिंगच्या युगात महिला बचत गटांनी दर्जेदार वस्तूंचे उत्पादन करावे – मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती अर्पिता ठुबे (भा.प्र.से.)
अंबाजोगाई नगरपरिषदेकडून बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
ऑनलाईन मार्केटिंगच्या युगात टिकेल अशा दर्जेदार वस्तूंचे उत्पादन महिला बचत गटांनी करावे असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती अर्पिता ठुबे (भा.प्र.से.) यांनी केले. त्या अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने आयोजित बचत गटातील महिलांना विविध योजनांचे मार्गदर्शन शिबिरात बोलत होत्या.
नगरपरिषद अंबाजोगाई यांच्या वतीने सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बचत गटातील महिलांना विविध योजनांचे मार्गदर्शन शिबिर हे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान नगर परिषद अंबाजोगाई व शहर उपजिविका केंद्र (सीएलसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. शहरातील बचत गटातील महिलांना विविध योजनांची माहिती होण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन शिबिर अतिशय उपयुक्त ठरले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती अर्पिता ठुबे (भा.प्र.से.) या होत्या. याप्रसंगी स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे, डीएवाय – एनयुएलएम विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक दिलीप तांबारे आणि समीर शेख हे उपस्थित होते. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून उपस्थित महिला बचत गटांच्या कार्यकर्त्या, सभासद यांच्याशी संवाद साधताना श्रीमती अर्पित ठुबे यांनी सांगितले की, महिला बचत गटांनी उत्पादित वस्तू, पदार्थ, साहित्य इत्यादी बाबींचे मार्केटिंग, उत्तमरित्या केले पाहिजे, सध्याचे युग हे ऑनलाईन मार्केटिंगचं आहे, त्यामध्ये सुद्धा आपण महिलांनी विविध प्रकारचे लायसन्स नोंदणी करून तसेच उत्पादित वस्तू दर्जेदार व वस्तूंचे डिझाईनिंग, पॅकेजिंग आकर्षक, उत्कृष्ट कसे राहील याचे प्रॉपर ट्रेनिंग घेऊन आधुनिक स्पर्धेच्या युगामध्ये टिकेल यासाठी पुढे आले पाहिजे. उपस्थित महिलांना त्यांनी विविध स्वरूपाची उदाहरणे देऊन उद्योग व्यवसाय करणेसाठी पुढे आले पाहिजे असे त्या म्हणाल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये त्यांनी अंबाजोगाई शहरातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शहर उपजीविका केंद्र (सीएलसी) सेंटर सुरू करण्यासाठी महिलांना माझी ज्या-ज्या ठिकाणी मदत लागेल, त्या-त्या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध राहील असे अभिवचन दिले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू,पदार्थ, साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अंबाजोगाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती अर्पिता ठुबे (भा.प्र.से.) यांनी बचत गटाच्या प्रत्येक स्टॉलवर जाऊन उत्पादित वस्तू, पदार्थ, साहित्याची माहिती घेऊन महिलांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रम प्रसंगी डीएवाय – एनयुएलएम विभाग अंतर्गत कामकाजाची माहिती शहर अभियान व्यवस्थापक दिलीप तांबारे व समीर शेख यांनी सांगितली तसेच रोहिणी कडेकर, अध्यक्ष शहरस्तर संघ यांनी मनोगत व्यक्त करताना सीएलसी सेंटर सुरू करण्याकरीता लागणाऱ्या आवश्यक बाबींची माहिती दिली. यावेळी वर्षा सूर्यवंशी, सचिव शहरस्तर संघ, मीरा जाधव, डीएवाय – एनयुएलएम रिसर्च ऑर्गनायझर (आरओ) पीएमएफएमई योजना, अर्चना धुरंदरे अध्यक्ष गोराई महिला बचत गट इत्यादी महिलांनी आपले मनोगत व्यक्त करून अनुभव कथन केले. तर आरती दहिवाळ, सारिका दहिवाळ, सरिता सातपुते, राणी सातपुते, रत्नमाला तरकसे, शिवकन्या निकम इत्यादी बचतगटातील महिलांनी वस्तू खाद्यपदार्थ तसेच शोभेच्या वस्तू स्टॉल मध्ये ठेवले होते. या कार्यक्रमांमध्ये जिजाऊ स्वयंसहाय्यता महिला बचत गट, आनंदी स्वयंसहाय्यता महिला बचत गट, गोराई स्वयंसहाय्यता महिला बचत गट अर्चना धुरंदरे, आदिशक्ती स्वयं स्वयंसहाय्यता महिला बचत गट आरती दहिवाळ, आईसाहेब स्वयंसहाय्यता महिला बचत गट राणी सातपुते, पल्लवी लखेरा, सारिका सातपुते, श्री त्रिभुवणी महिला स्वयंसाहय्यता बचत गट रेखा मंत्री, यश महिला स्वयंसाहय्यता बचत गट, मुमताज पठाण, एकदंत स्वयंसहाय्यता महिला बचत गट अर्चना सातभाई, कन्यका परमेश्वरी स्वयंसहाय्यता महिला बचत गट शीतल सातभाई व रूपाली सातभाई इत्यादी बहुसंख्य बचत गटातील महिलांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्षा रोहिणी कडेकर, वर्षा सूर्यवंशी, प्रियंका राऊत, सोनाली शिंदे, निर्गुण हावळे, अर्चना सातभाई, रेखा पांचाळ, शिल्पा पाईकराव इत्यादींनी पुढाकार घेतला.