पशुसंवर्धनाच्या व्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील – ना. पंकजा मुंडे
पुण्यात सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटलसह विविध प्रयोगशाळेचे ना. अजितदादा पवार व ना. पंकजाताई मुंडेंच्या हस्ते थाटात उद्घाटन*

पुणे-:
मानवाचे व पशुंचे नाते अनादी काळापासूनचे आहे. मानवाच्या प्रगतीत पशुधनाचा वाटाही मोलाचा आहे. राज्याच्या विकासात्मक स्थित्यतरांमध्ये पशुसंवर्धनाचे योगदानही नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाची प्रक्रिया अधिक व्यापक व गतिमान करण्यासाठी पशुसंवर्धनाच्या व्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा प्राप्त होण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी केले.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत, बीएसएल-3 व बीएसएल-२ प्रयोगशाळा, राष्ट्रीय संदर्भिय लस चाचणी गुणनियंत्रण प्रयोगशाळा व सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटल, औंध या संस्थांचे उद्घाटन उप मुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, आ. उमा खापरे, विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशूसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, सहआयुक्त डॉ. श्यामकांत पाटील, पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेचे सहआयुक्त डॉ. याहयाखान पठाण, भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी रोग अन्वेषण विभागाचे सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. गौरीशंकर हुलसरे आदी यावेळी उपस्थित होते.
*दूध भेसळ रोखण्यासाठी कडक कायदा – ना. पंकजा मुंडे*
————-
राज्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांचा कार्यक्रम समुपदेशनाद्वारे पार पाडण्यात आला. विभागाच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयामुळे पशुवैद्यकाच्या शिक्षण, कौशल्य व अनुभवानुसार त्याला अपेक्षित ठिकाणी लोकसेवा बजावण्याची संधी मिळाली. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी वर्गात आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. आता पशुरोग निदानाची कार्यवाही जलद गतीने करण्यासाठी विभागाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत, बीएसएल-3 व बीएसएल-२ प्रयोगशाळा, राष्ट्रीय संदर्भिय लस चाचणी गुणनियंत्रण प्रयोगशाळा व सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटल, औंध या संस्थांचे कार्यान्वयन करून मोठे लक्ष्य गाठले आहे. ज्याचा सकारात्मक परिणाम पशुसंवर्धनातील व्यवसाय वृद्धीवर होणार आहे.
पर्यावरणामध्ये प्लास्टीक वापराचे दुष्परिणाम दृश्य स्वरुप घेऊ लागले आहेत. पशुधनालाही प्लास्टीकपासून मोठी बाधा निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टीक बंदीबाबत राज्य सरकार निश्चितच कार्यवाही करेल, असा आशावाद व्यक्त करतानाच ना. पंकजा मुंडे यांनी राज्यात दूध भेसळीची समस्या अलिकडे जाणवू लागल्याचे सांगत अशा चुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी लवकरच कडक स्वरुपाचा दूध भेसळ प्रतिबंधक कायदा केला जाणार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
*पशुपालकांचे उत्पन्न वाढविणार- ना. अजित पवार*
——
पशुसंवर्धनाच्या व्यवसायाने राज्याचे अर्थचक्र गतिमान ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पशुपालकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आपण सर्वांनी समग्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्य सरकार त्यासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करण्यासाठी नेहमीच वचनबद्ध राहिल, असे आश्वासन यावेळी ना. अजित पवार यांनी देत विभागाच्या पुढीला वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*पशुसंवर्धन विभाग पहिल्या पाच मध्ये*
———
पशुसंवर्धन विभागाने शासनाच्या 100 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात पहिल्या पाच विभागांमध्ये मानांकन मिळवत पारदर्शक व गतिमान प्रशासनासाठी विभागाची सिद्धता अधोरेखित केली आहे. राज्य शासनाने यासाठी पशुसंवर्धन विभागाला नुकतेच गौरवान्वित केले आहे.
••••