दुकान जळाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मित्राला सुरू करून दिला नवा व्यवसाय —-
रोटरी क्लबचा अनोखा उपक्रम
अंबाजोगाई -: आगीत रेडीमेड कपड्यांचे दुकान जळून खाक झाले.यात गणेश राऊत यांचे २५ लाखांचे नुकसान झाले. हताश झालेल्या राऊत यांना रोटरी क्लबच्या सर्व मित्रांनी एकत्रित येत भरघोस मदत केली. या मदतीतून आज त्यांच्या नवीन हॉटेल व्यवसायाची सुरुवात झाली. मित्रांच्या या मदतीच्या झऱ्याने उध्वस्त झालेल्या कुटुंबाला जगण्याचे नवे बळ मिळाले.
येथील अत्यंत सामान्य कुटुंबातील गणेश राऊत यांनी १० वर्षापूर्वी अल्प भांडवलावर रेडीमेड कपड्यांचे दुकान सुरू केले. हळू हळूहळू त्यांनी या व्यवसायात मोठी प्रगती केली. ते स्वतःच्या कष्टातून उभ्या केलेल्या साम्राज्यावर उभे असतानाच नियतीने डाव साधला. अचानक लागलेल्या आगीत त्यांचे रेडीमेड कपड्यांचे दुकान जळून खाक झाले. यात त्यांचे २५ लाखांपेक्षाही ज्यात नुकसान झाले. तांत्रिक अडचणी मुळे त्यांना कसलाही विमा,अथवा मदत मिळाली नाही. अचानक कोसळलेल्या संकटामुळे राऊत कुटुंबीय मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले. गणेश राऊत हे रोटरी क्लब चे माजी सचिव होते. त्यांच्या या दुःखात रोटरी परिवार सहभागी झाला. मात्र केवळ दुःख न करीत बसता या आर्थिक विवंचनेतून त्यांना सावरण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. असा निर्धार रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण काळे व सचिव धनराज सोळंकी यांनी केला. रोटरी क्लब मधील ८६ सदस्यांची बैठक घेतली. व पुन्हा राऊत यांना नव्याने व्यवसायात उभा करण्याचा संकल्प केला. सर्व सदस्यांनी जशी जमेल तशी आर्थिक मदत राऊत यांना केली. दुर्घटने नंतर चारच महिन्यात गणेश राऊत यांना नवीन हॉटेल व्यवसाय उभा करून दिला. शनिवारी सकाळी या नवीन व्यवसायाची शानदार सुरुवात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा,राऊत यांच्या मातोश्री कस्तुरबाई राऊत,
रोटरीचे अध्यक्ष कल्याण काळे,सचिव धनराज सोळंकी व सर्व रोटरी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्या मित्राला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी त्यांच्या पंखात आर्थिक बळ निर्माण केले. व विवंचनेत सापडलेल्या कुटुंबाला धीर दिला. रोटरीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.