मेजर एस.पी. कुलकर्णी यांची पर्यावरण दूत म्हणून निवड

अंबाजोगाई-: वृक्षमित्र म्हणून ओळख असलेले तसेच महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त मेजर एस.पी. कुलकर्णी यांची पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र शासन व नगर परिषद अंबाजोगाई यांच्या वतीने पर्यावरण दूत म्हणून निवड झाली आहे. सदर निवडीचे पत्र आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी झटणारे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविणारे पर्यावरण प्रेमी म्हणून कुलकर्णी यांची खास ओळख आहे. मेजर एस.पी. कुलकर्णी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपण जलसंधारण प्रदूषण नियंत्रणासाठी जनजागृती आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रचार या सारख्या विविध कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांची दूरदृष्टी, अथक प्रयत्न यामुळे अनेक गावांमध्ये आणि शहरी भागात पर्यावरणाप्रति लोकांमध्ये जागृती निर्माण केली आहे. त्यांनी आजपर्यंत हजारोंवर वृक्ष लागवड केली असून त्याच्या संवर्धनासाठी ते प्रयत्न करत असतात. विशेषतः तरुणांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात, वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे तसेच योगेश्वरी शिक्षण संस्थेत त्यांनी कारगिल युद्धातील शहिदांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली असून त्याद्वारे त्यांनी अनेकविध देशी वृक्षांची लागवड केली आहे व त्याचे संवर्धन केले आहे. या निवडीनंतर सर्व स्तरातून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.