केज मतदार संघातील भटक्या विमुक्त जाती, जमातीमधील बेघरांसाठी पाच हजार घरकुले मंजूर

अंबाजोगाई – राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत बीड जिल्ह्यासाठी १७ हजार ८१ घरकुले मंजूर झाली असून त्यापैकी जवळपास पाच हजार घरकुले एकट्या केज मतदार संघातील असल्याची माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली. यासोबतच मतदार संघातील भटक्या विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जमातीमधील एकही बेघर घरकुलापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देखील आ. मुंदडा यांनी दिली.
जे लोक उदारनिर्वाहासाठी गावातून दुसऱ्या गावासाठी जातात रोज रोजगाराचे काम करतात. अशा लोकांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध नसल्या कारणामुळे यांच्या आयुष्याची फरफट होते. अशा लोकांना आपल्या हक्काचे घर बांधण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. भटक्या विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जमाती यांच्या पक्या घरासाठी आपल्या राज्य शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली आहे. या योजनेतून प्रस्ताव दाखल केलेल्या अधिकाधिक गरजवंतांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचा पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या प्रयत्नामुळे बीड जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या एकूण १७ हजार घरकुलापैकी पाच हजार घरकुले एकट्या केज मतदार संघातील गरजवंतांना मंजूर झाली आहेत. अजूनही जे गरजवंत घरापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी प्रयत्नपूर्वक घरकुले उपलब्ध करून दिले जातील. मतदार संघातील एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आ. नमिता मुंदडा यांनी सांगितले. मोठ्या संख्येने गरजवंतांना घरकुले उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे, भाजप नेत्या प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.