डागर बंधूंना पद्मश्री शंकर बापूजी धृपद गौरव पुरस्कार प्रदान
अंबाजोगाईत संगीत सभेने रसिक मंत्रमुग्ध

अंबाजोगाई : येथील पद्मश्री कै. शंकरबापू आपेगावकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा पद्मश्री शंकर बापूजी धृपद गौरव पुरस्कार शुक्रवारी (दि.३) जगप्रसिध्द धृपद गायक उस्ताद नफिसोद्दिन डागर व अनिसोद्दिन डागर या बंधूंना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यानिमित्त झालेल्या धृपद संगीत सभेत डागर बंधूंनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत व वारकरी संप्रदायातील मान्यवर व्यक्तींना पद्मश्री शंकरबापूंच्या स्मृती हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार सोहळा येथील इट अँड स्टे या हाॅटेलच्या सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी नॅचरल शुगरचे प्रमुख बी.बी. ठोंबरे हे होते. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डाॅ. सुरेश खुरसाळे, उद्योजक लक्ष्मणराव मोरे, डॉ. नंदकिशोर सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रख्यात पखावज वादक उध्दवबापू आपेगावकर व संध्याताई आपेगावकर यांची उपस्थिती होती.
—
बापूंनी समर्पणातून कला जोपासली
पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांनी आयुष्यभर पखावजाची संगीत कला समर्पणातून जोपासली. संगीत पाषाणालाही पाझर फोडते, मन आणि बुध्दी तल्लीन होण्याची जादू संगीतामध्ये
आहे. असे सांगून डागर बंधूंचे धृपद गायन श्रवण करण्याची संधी मिळाल्याच्या भावना बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केल्या.
—-
वडील उस्ताद सईदोद्दीन डागर यांच्यामुळे आम्ही धृपद संगीतात उभे राहिलो, त्यांची ही धृपद संगीताची पताका खांद्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. बापूंच्या नावे मिळालेल्या पुरस्काराने आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे. त्याचा आदर करून शंकरबापूंच्या कलेला व त्यागाला उस्ताद डागर बंधूंनी नमन केले.
याप्रसंगी लक्ष्मणराव मोरे व डाॅ. सुरेश खुरसाळे यांनीही शंकर बापूंच्या आठवणी सांगितल्या. उध्दवबापू आपेगावकर यांनी पुरस्काराची संकल्पना व भुमीका मांडली. या पुरस्काराचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. सन्मानपत्राचे वाचन सीमा सोमवंशी यांनी केले. सूत्रसंचालन आसाराम जोशी यांनी केले. आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमास माईर्स एमआयटी परिवारातील जेष्ठ तुळशीराम कराड यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मधुवंती देव (पुणे), प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे, संगीत क्षेत्रातील श्री. बार्शीकर, देविदास कुलकर्णी (कळंब), तुकाराम महाराज मुंडे, ज्येष्ठ समाजसेवक विठुसेठ आग्रोया यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
धृपद व पखावजाची जुगलबंदी
या पुरस्कार सोहळ्यापुर्वी डागर बंधूंचे धृपद गायन झाले. प्रारंभी त्यांनी राग आलाप व जोडझाला घेऊन कर्नाटकी थाटातील काम्बोजी हा राग सादर करून आपले वेगळेपण दाखवले. त्यांनी गायलेल्या शिव,शिव,शिव या आडाना रागाची लय बध्दता व आवाजातील आर्जवाने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. सूलतालातील बंदिशीमध्ये धृपद व पखावजाची जुगलबंदी झाली. उध्दवबापू आपेगावकरांनी आपल्या पखावज वादनाने या संगीत सभेला झालर चढवली. सभागृहात उपस्थित रसिकांनी या जुगलबंदीला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.