शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी आक्रमक
शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा महामार्ग रद्द करण्याची मागणी

अंबाजोगाई – राज्यातील बहुतांशी धार्मिक स्थळे जोडणाऱ्या नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गासाठी अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो एकर शेती संपादीत होत असल्याने अनेक शेतकरी कुटुंब उध्वस्त होणार आहेत. या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग पवनार ते पत्रादेवी (नागपुर गोवा) घोषीत केला आहे. या राज्यमहामार्गामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील गीता,भारज,नांदगाव, वरवटी,पिंपळा,सायगाव या गावातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या बागायती जमीनी संपादीत केल्या जाणार आहेत. त्यामुळे हे शेतकरी शक्तीपीठ महामार्गामुळे बाधीत होणार असून कायम स्वरुपी उद्ध्वस्त होणार आहेत. या सर्व शेतकऱ्यांची रोजीरोटी या शेतीवरच अवलंबून असल्याने त्यांच्यावर बेरोजगार होऊन उपासमारी आणि भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे. हे सर्व जमीन धारक हे अल्प भुधारक असून या भागात शेतीशिवाय दुसरे कोणतेही उपजिवीकेचे साधन उपलब्ध नाही. या महामार्गामुळे बाधीत शेतकरी तसेच शेतमजूर बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे व त्यांचे संसार कायम स्वरुपी उद्ध्वस्त होऊन ते देशोधडीला लागणार आहेत. वास्तविक संपादीत होऊ घातलेल्या जमीनी या उच्च प्रतीच्या बागायती व उपजाऊ असल्या कारणाने संपादनामुळे देशाच्या उत्पंनात घट होऊन निसर्गाचीही प्रचंड हानी होणार आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे या संपादीत होऊ घातलेल्या बहुतांश जमीनी वरुन महावितरणची अतिउच्च दाबाची लाईन गेलेली असुन सध्या ती चालू स्थितीमध्ये कार्यरत असल्याने महामार्गासाठी पर्यायी भागाचा विचार करणे शासनाच्या दृष्टीने हिताचे आहे.
त्यामुळे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करुन पर्यायी भागाचा विचार करावा किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या नागपुर ते रत्नागीरी किंवा इतर मार्गाचा विचार करुन शेतकऱ्याप्रती आपली सहानुभुती दाखवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यापुर्वी देखील या महामार्गास वेळोवळी सनदशीर मार्गाने तीव्र विरोध दर्शविला आहे. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून आम्हा शेतकऱ्यांचे व आमच्यावर अवलंबुन असलेल्या आमच्या कुटुंबीयांचे कायम स्वरुपी होणारे नुकसान टाळावे अशी विनंती देखील निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांसमवेत कॉम्रेड अजय बुरांडे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. बाबुराव तिडके, शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड आदी उपस्थित होते.