खेळाला प्राधान्य देणे गरजेचे : डॉ. सुरेंद्र आलुरकर
संस्थांतर्गत पुरुष कर्मचारी स्पर्धेत खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचा संघ प्रथम तर महिला कर्मचाऱ्यांच्या बुद्धिबळ स्पर्धेत माधुरी अष्टेकर प्रथम

प्रतिनिधी : दि. 8 ऑक्टोबर 2024 ( अंबाजोगाई )
आधुनिक काळातील धकाधकीच्या जीवनामध्ये आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या खेळात सहभाग नोंदवला पाहिजे व स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक पाऊल उचलले पाहिजे . खेळातून खूप आनंद मिळत असतो तसेच खेळातून सकारात्मकता वाढते त्यामुळे अनेक गोष्टी सहज सुलभ होतात. यासाठी खेळाला प्राधान्य देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भा. शि. प्र. संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर यांनी केले.
ते येथील खोलेश्वर महाविद्यालयात भा. शि. प्र. संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या व्हॉलीबॉल व बुद्धिबळ स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भा. शि. प्र. संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, केंद्रीय कार्यकारणी सदस्य विष्णुपंत कुलकर्णी, अविनाश तळणीकर, आप्पाराव यादव , खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष विजयराव वालवडकर व प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.आलुरकर म्हणाले की, जीवनात खेळ अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येकाने एखाद्या तरी क्रीडा प्रकारात सहभाग घेतला पाहिजे .आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायाम देखील महत्त्वाचा आहे असे सांगून त्यांनी व्यायामाचे महत्त्व विशद केले.
यावेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या पुरुष कर्मचाऱ्यांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत
प्रथम क्रमांक – श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई तर द्वितीय क्रमांक लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय, उदगीर यांनी प्राप्त केला. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान संदीप बोधनकर (लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय, उदगीर) यांनी पटकावला.
या याबरोबरच महिला कर्मचाऱ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक माधुरी अष्टेकर (खोलेश्वर जीनियस सीबीएससी स्कूल ,अंबाजोगाई) यांनी तर द्वितीय क्रमांक प्रा. डॉ. रोहिणी अंकुश (खोलेश्वर महाविद्यालय ,अंबाजोगाई ) यांनी प्राप्त केला तर सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान माधुरी पुसकर (सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय, माजलगाव ) यांनी पटकावला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विनय राजगुरू यांनी केले तर वैयक्तिक पद्य प्रा. शैलेश पुराणिक यांनी सादर केले आणि आभार प्रा. राहुल चव्हाण यांनी मानले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संकेत सुरवसे ,ऋतिक लोखंडे , विजय तपके, पवन भाजने यांनी काम पाहिले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.राहुल चव्हाण, प्रा. डॉ.माणिक पोखरकर व विद्यार्थी चि. योगेश कोळी , चि.शंतनु बोडके कु. भक्ती तपसे , कु. कृतिका कदम आदींनी परिश्रम घेतले. या स्पर्धेत संस्थेतील 17 संस्कार केंद्राचे संघ सहभागी झाले होते.