वसतिगृहातील ३८ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथील घटना

अंबाजोगाई : तालुक्यातील येल्डा येथील जिल्हा परिषद मार्फत चालविल्या जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या हंगामी वसतिगृहातील ३८ विद्यार्थ्यांना रविवार (दि.८) रात्री अन्नातून विषबाधा झाली. यात एका महिलेचाही समावेश आहे. दरम्यान या मुलांवर स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी घरी पाठवण्यात आले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
येल्डा येथील जिल्हा परिषद शाळेंतर्गत ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहात तीन शाळेतील १८४ विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी फक्त जेवणासाठी तिथे येतात. रात्री निवासाला आपापल्या घरी जातात. इयत्ता पहिले ते दहावी पर्यंतच्या मुलांचा यात समावेश आहे.
रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. त्यात बटाटा भाजी, भात, भाकरी असे पदार्थ होते. हे विद्यार्थी जेवण करून घरी गेल्यानंतर रात्री १२ च्यानंतर यापैकी काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. वसतिगृह कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी तातडीने रिक्षामध्ये
स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे तपासणीत आढळून आले. सोमवारी (दि.९) सकाळपर्यंत ३८ विद्यार्थी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
मात्र आवश्यक मुलांना उपचारासाठी दाखल करून काहींना घरी पाठवण्यात आले.