विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 तारखेला निकाल
राज्यातील विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठीचं संपूर्ण वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे.
•निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
•अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
•अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
•अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
•मतदान : 20 नोव्हेंबर 2024
•मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
•एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
•नव मतदार – 20.93 लाख
•पुरूष मतदार – 4.97 कोटी
•महिला मतदार – 4.66 कोटी
•युवा मतदार – 1.85 कोटी
•तृतीयपंथी मतदार – 56 हजारांहून जास्त
•85 वर्षावरील मतदार – 12. 48 लाख
•शंभरी ओलांडलेले मतदार – 49 हजारांहून जास्त
•दिव्यांग मतदार – 6.32 लाख
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारीखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे.
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.