‘भारतीय संविधान’ हे खऱ्या अर्थाने लोकशाहीची रुजवणुक करणारे संविधान आहे.- ज्ञानेश मातेकर.

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भारतात एकता,एकात्मता आणि बंधुता कायम राहावी.भारतातील लोकशाहीचा आदर्श सर्व जगाने घ्यावा यासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून भारतीय संविधानाची निर्मिती केली.त्यांनी निर्माण केलेले ‘भारतीय संविधान’ हे खऱ्या अर्थाने लोकशाहीची रुजवणूक करणारे संविधान आहे असे विचार जेष्ठ शिक्षक तथा इतिहास अभ्यासक ज्ञानेश मातेकर यांनी मांडले.
दि.२६ नोव्हेंबर २०२४ मंगळवार रोजी पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात संपन्न झालेल्या ‘संविधान दिन’ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयराव विभूते यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले.तसेच संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक मातेकर यांनी संविधानाची जडणघडण याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.तसेच बाबासाहेबांनी भारतीय संस्कृती,भाषा,प्रांत,समाज,शिक्षण इ बाबींचा सखोल विचार करून संविधान निर्माण करण्यासाठी विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि खऱ्या अर्थाने भारतात लोकशाही नांदावी अशी राज्यघटना निर्माण केली असे मत शेवटी त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांनी संविधान ग्रंथाचे अवलोकन आणि वाचन केले.तसेच याप्रसंगी मुंबई येथे दि.२६ नोव्हेंबर २००८ रोजी झलेल्या आतंकवादी हल्ल्यातील शाहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नितीन चौधरी यांनी केले.
सर्व विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.