अंबाजोगाई परिसरात पर्यटन व्यवसायाला भरपूर संधी
ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांचे मत

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई परिसरात पर्यटन व्यवसायाला भरपूर संधी असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार
यांनी व्यक्त केले.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्यावतीने २४ ऑक्टोबर २०२४ रोजी “अंबाजोगाई परिसरातील पर्यटनाच्या संधी” या विषयावर कार्यशाळेचे उद्घाटन व बीज भाषक म्हणून सुदर्शन रापतवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ऍड. माणिकराव बावणे तर व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांची विशेष उपस्थिती होती.
आपल्या विस्तारीत भाषणात सुदर्शन रापतवार यांनी अंबाजोगाई शहराला लाभलेल्या ऐतिहासिक, पौराणिक, नैसर्गिक, धार्मिक पार्श्वभूमीचा सर्वांगिण उल्लेख करीत या गावाची भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती ही पर्यटन उद्दोगाला चालना देणारी असून या परिसरात उपलब्ध असलेल्या या नैसर्गिक परिस्थिताचा उपयोग पर्यटन व व्यवसायाच्या संधी वाढवण्यासाठी करावयाला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात हा कार्यक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट करून पर्यटन ही आजच्या काळाची महत्त्वाची बाब असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी बोलतांना प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे यांनी अंबाजोगाई परिसरातील पर्यटन स्थळाची माहिती देऊन अंबाजोगाईच्या परिसरात पर्यटन व्यवसाय विकसित होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर चर्चा केली. तसेच पर्यटनातून तरुणांना रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतो. याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना ऍड. माणिकराव बावणे यांनी अंबाजोगाई व परिसरातील इतिहासाचा आढावा घेऊन अंबाजोगाई परिसरातील ऐतिहासिक घटनांचा दाखला देत अंबाजोगाई परिसरात पर्यटन विकसित होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनंत मरकाळे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी असे १४५ लोक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी समी खान यांनी केले.