अॅड.माधव जाधव यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा ठिकठिकाणी निषेध
घाटनांदुर बंद तर अंबाजोगाईत महिलांनी दिले उपजिल्हाधिकार्यांना निवेदन

अंबाजोगाई -: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते अॅड.माधव जाधव यांना बुधवारी परळी येथील बँक कॉलनीच्या मतदान केंद्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा ठिकठिकाणी निषेध नोंदविण्यात आला. घाटनांदुर येथील ग्रामस्थांनी बंद पाळला. तर अंबाजोगाईत महिलांनी व व्यापार्यांनी उपजिल्हाधिकारी यांना आरोपीच्या अटकेची मागणी करणारे निवेदन दिले व या घटनेचा निषेध नोंदविला.
परळी विधानसभा मतदार संघात अन्याय व अत्याचारा विरोधात अॅड.माधव जाधव हे सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्या या कार्याचा विरोधकांनी राग मनात धरून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जाधव जखमी झाले आहेत. माधव जाधव यांना मारहाण करणार्या गुन्हेगारांवर गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ अटक करावे. या मागणीचे निवेदन अंबाजोगाई तालुक्यातील महिलांनी उपजिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे , केज विधानसभेचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व महिलांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच यावेळी व्यापारी व हमाल मापाडी महासंघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.