योगेश्वरी महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात

**
*————-*
अंबाजोगाई – येथील योगेश्वरी महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने नुकतीच “शाश्वत जीवावरणासाठी सूक्ष्मजीव” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सेमिनारचे मुख्य संघटक सचिव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्हि. कानेटकर हे होते तर निमंत्रक म्हणून सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिल नरसिंगे यांनी भूमिका पार पाडली. या परिसंवादाचा मुख्य उद्देश सूक्ष्मजीवशास्त्र क्षेत्रातील आधुनिक संशोधन व तंत्रज्ञान याविषयी विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना मार्गदर्शन करणे हा होता. या एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मा.डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या हस्ते झाले. या राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध राज्यातून एकूण ४७१ शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. तसेच नेपाळ येथील दोन प्राध्यापकांनी या परिषदेत सहभाग नोंदविला. उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, उपकेंद्र, धाराशिव येथील प्रभारी संचालक डॉ. प्रशांत दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. दीक्षित आपल्या व्याख्यानात म्हणाले की, आपण आपली भरभराट करण्याच्या मोहापायी आपण आपली परिसंस्था नष्ट करत आहोत. आपण आपली परिसंस्था टिकवण्यासाठी शाश्वत विकासासाच्या शोधात आहोत. आपण सूक्ष्मजीवांचा वापर मानवी कल्याणासाठी, शाश्वत विकासासाठी केला पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. सी एल. बर्दापूरकर हे होते. मा. बर्दापूरकर यांनी या एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादासाठी सर्व आयोजन समिती व सहभागी प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या परिसंवादाच्या निमित्ताने विषयातील अद्ययावत माहिती, संशोधन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचेल अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे स्वागत संबोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्हि. कानेटकर यांनी केले. यावेळी मंचावर संस्थेचे सहसचिव प्राचार्य भीमाशंकर शेटे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.आर.व्हि.कुलकर्णी, आय. क्यू.ए. सी. समन्वयक प्रा. डॉ. वाय. एस. हंडीबाग तसेच सर्व व्याख्याते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमंत्रक प्रा. डॉ. अनिल नरसिंगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आदित्य कदम व तुषार करपुडे यांनी केले. या राष्ट्रीय परिसंवादात पहिल्या सत्रासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली येथील, लाईफ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. अरुण खरात यांना आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात डॉ. अरुण खरात यांनी सूक्ष्मजीवांच्या उपयुक्तते विषयी सविस्तर अशी महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण माहिती दिली. डॉ. खरात म्हणाले की ज्यावेळी आपण सूक्ष्मजीवांविषयी चर्चा करतो त्यावेळी आपण त्याकडे एक धोका म्हणून पाहतो. सूक्ष्मजीव हे धोकादायक नसून ते मानवी कल्याणासाठी उपयुक्त आहेत. आपल्या आतड्यातील फायदेशिर मयक्रोबायोटा कमी होत चालला आहे. ज्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी व प्रतिकार क्षमतेसाठी हे सूक्ष्मजीव अतिशय उपकारक आहेत. आपली अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी, दारिद्र्य नष्ट करण्यासाठी, चांगल्या प्रतिकार क्षमातेसाठी सूक्ष्मजीव हे महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. दुसऱ्या सत्रात विज्ञान संस्था, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई येथील प्रा. डॉ. उल्हास पाटील यांनी “सूक्ष्मजीवांच्या शक्तीचा उपयोग मानवी कल्याणासाठी”” याविषयावर रोचक पद्धतीने व्याख्यान दिले. तिसऱ्या सत्रात पुणे येथील आय.सी.एम. आर., राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेतील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. सुनील वैद्य यांनी लस प्रतिबंधक रोग याविषयी व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानात लस म्हणजे काय, लस संशोधन व निर्मिती, लस काढा प्रकारे कार्य करते, गोवर, गालगुंड व रुबेला या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम याविषयी माहिती सांगितली. शेवटच्या व चौथ्या सत्रात अहमदनगर येथील बायोम टेक्नॉलॉजीज चे सी. ई. ओ. , शास्त्रज्ञ व यशस्वी उद्योजक डॉ. प्रफुल गाडगे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी “जैव उद्योजकता व स्टार्ट अप संधी” या विषयावर प्रेरणादायी असे व्याख्यान दिले. तसेच यावेळी राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर्स व मॉडेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या वेगवेगळ्या विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी पोस्टर्स व मॉडेल चे अतिशय उत्कृष्ठपणे सादरीकरण केले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आली. समारोप कार्यक्रम प्रसंगी अंबाजोगाई येथील ख्यातनाम मनोविकास तज्ञ डॉ. राजेश इंगोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या सेमिनार चे उत्कृष्ठ नियोजन केल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व आयोजक टीमचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सातत्याने संशोधक वृत्ती अंगीकृत केली पाहिजे, नवनवीन शोध लावले पाहिजेत असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य भीमाशंकर शेटे हे होते. त्यांनी या राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजन समितीतील सर्व सदस्यांचे कौतुक केले व यापुढे ही विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्यासाठी अशाप्रकारचे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. आभार प्रदर्शन प्रा. आदित्य कदम यांनी केले.