पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक

अंबाजोगाई -: आपण पोलिस असल्याची बतावणी करून एका वयस्क जोडप्याच्या अंगावरील तीन तोळे वजनाचे सोने काढून द्यायला भाग पाडून ६० हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई – अहमदपूर महामार्गावरील धायगुडे पिंपळा गावानजीक गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी येथील मूळ रहिवासी बालाजी केशवराव माने वय ५५ व त्यांची पत्नी हे दोघे अंबाजोगाईहून गावाकडे साळुंकवाडी येथे गुरुवारी दि.१२ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोटर सायकल वरून निघाले होते. अंबाजोगाई – अहमदपूर या महामार्गावरील धायगुडे पिंपळा गावा नजीक एका वीट भट्टीच्या समोर खड्ड्याच्या ठिकाणी आरोपीने माने यांची मोटारसायकल अडवली. मी पोलीस असल्याची बतावणी केली.बनावट पद्धतीने तयार केलेले ओळखपत्रही दाखवले. अंगावर सोन्याचे दागिने ठेवू नका. रस्त्यावर लूटमार सुरू आहे. हातातील अंगठी, गळ्यातील चेन काढून ठेवा असे सांगितले. दरम्यान त्या ठिकाणी आणखी दोन आरोपीचे साथीदार पोचले. माने यांना ही गोष्ट खरी वाटली. भितीपोटी त्यांनी गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट व हातातली एक तोळ्याची अंगठी काढून रुमालामध्ये ठेवली. काढून ठेवलेले दागिने आरोपीने रुमाला सह पळून नेले व माने यांची फसवणूक केली. याप्रकरणी बालाजी माने यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस कर्मचारी अनिल बासर अधिक तपास करत आहेत.दिवसा ढवळ्या महामार्गावर चो-या व फसवणूक करून लूटण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.धायगुडे पिंपळा गावानजीक महामार्गावर दोन वर्षापासून पुलाचे
काम रखडले आहे.याठिकाणी खड्ड्यातून जावे लागते.चोर याचाच फायदा घेऊन वाहनधारकाची अडवणूक करतात.