गावचे सांस्कृतिक वैभव वृध्दींगत करणारी पुस्तके- डाॅ. वृषाली किन्हाळकर
सुदर्शन रापतवार यांच्या असामान्य, मंदिराचे गाव व सहज सुचलं म्हणून या पुस्तकांचे प्रकाशन

अंबाजोगाई-: ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी लिहिलेल्या तीनही पुस्तकातील लेखन माणुसकी जपणारे व गावचे सांस्कृतिक वैभव वृध्दींगत करणारे आहे. असे प्रतिपादन डाॅ. वृषाली किन्हाळकर यांनी रविवारी येथे केले.
येथील आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात श्री. रापतवार यांनी लिहिलेल्या असामान्य, मंदिराचे गाव व सहज सुचलं म्हणून या तीन पुस्तकांचे प्रकाशन पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार रजनीताई पाटील, आमदार नमिता मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व वृषाली किन्हाळकर यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी डाॅ. किन्हाळकर बोलत होत्या.
डाॅ. किन्हाळकर यांनी तीनही पुस्तकांचा परामर्ष घेतला. अंबाजोगाईच्या संस्कृतिची जाणीव व अनुभव असल्याने जुन्या गोष्टींना उजाळा देत व काही संदर्भ देऊन पुस्तकात उल्लेख असलेल्या अंबाजोगाईतील माणसांच्या जडणघडणीवर त्यांनी प्रकाश टाकला. असामान्य हे तर पुस्तक माणसांचे मेनूकार्डच असल्याचे त्या म्हणाल्या. मंदिराच्या गावातून या गावची संस्कृती मांडण्याचा चांगला प्रयत्न झाला आहे.
—
ग्रंथ संपदेची परंपरा असलेले गाव – मुंडे
अंबाजोगाई हे संत व ग्रंथ संपदेची परंपरा असलेले गाव आहे. आपण जरी पुस्तके वाचली नसली तरी माणसांचे चेहरे व व्यथा पाहुन त्यांना ओळखण्याचं साहित्य मी जाणतो. श्री. रापतवार यांनी आपल्या तिनही पुस्तकातून समाज सुधारक व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार रजनीताई पाटील म्हणाल्या की, असामान्य मध्ये सामान्यतले असामान्य हे या पुस्तकात शोधले आहे. तसे अंबाजोगाई हे स्फूर्ती केंद्र आहे. नविन पिढीला या पुस्तकातून बोध होणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी मागणी नेहमीच आपण करतो, परंतु आपण संसदेत एक तरी भाषण आपल्या भाषेत झाले पाहिजे असा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या, अंबाजोगाईत अनेक सांस्कृतिक संचित आहेत. या पुस्तकात असलेले हे संचित जपण्यासाठी राज्यशासनाकडून निधी आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्या दृष्टीने मागील वर्षभरात पौराणिक लेण्यांची कामे सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
साहित्य हे मानवी मनाचा आरसा असतो, ते मांडण्याचे काम श्री. रापतवार यांनी या पुस्तकात केले असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले.
सुदर्शन रापतवार यांनी माध्यम प्रकाशनातर्फे प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची भूमीका विषद केली. ते लिहितानाचे आलेले काही अनुभवही सांगितले. सूत्रसंचालन अभिजित जोंधळे यांनी केले. विजय रापतवार यांनी आभार मानले.