माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत अंबाजोगाई नगर परिषदेला ७५ लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक

अंबाजोगाई : – महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत संभाजी नगर विभागातून अंबाजोगाई नगर परिषदेने ७५ लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान ४.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.
“माझी वसुंधरा अभियान ४.०” साठी डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापनासाठी गुण ठेवण्यात आले माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोनहो मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान ४.० मधील लोकासंख्यानिहाय सर्व गटातील विजेते तसेच, महसूल विभाग व जिल्ह्याच्या एकूण कामगिरी वरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची शासनाच्या मान्यतेनंतर निवड करण्यात आली आहे. “माझी वसुंधरा अभियान ४.०” चा अंत्तीम निकाल जाहिर करण्यास शासन मान्यता देत आहे. गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील पारितोषिक जाहिर करण्यात आले असुन संभाजी नगर विभागा मधून अंबाजोगाई नगर परिषदेला २४ गुण प्राप्त झाले असून प्रथम क्रमांक मिळाल्याने ७५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.अंबाजोगाई नगर परिषदेने मिळवलेल्या यशा बद्दल मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे सह सर्व न प कर्मचाऱ्यांचे स्वागत होत आहे.
