कार पुलावरून घसरली; अपघातात दोघे जखमी

अंबाजोगाई -: भरधाव वेगाने येणारी कार पुलावरून खाली घसरली व खड्ड्यात पडली. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. या दोघांवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात गुरुवारी सायंकाळी मोरेवाडी परिसरात झाला.
शहरातील ‘स्वाराती’ रुग्णालय ते मोरेवाडी रस्त्यावर एक भरधाव कार थेट पुलाखाली उलटली आहे. कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही अपघाताची घटना घडली.
अपघाताची घटना घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी सतर्कता दाखवत सदरिल कारमधील दोघांना उपचारासाठी ‘स्वाराती’ रुग्णालयात दाखल केले. सदरिल कार ही पुण्याची असून अपघातात जखमी झालेले हे अंबाजोगाई येथील रहिवासी आहेत. कारमधील जखमींची नावं संतोष तावरे आणि दयानंद वाघमारे अशी आहेत. दिपावली सणानिमित्त हे दोघेही आपल्या अंबाजोगाई या गावी आले होते. जखमींवर ‘स्वाराती’ रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत.