यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे शानदार उदघाटन
विचार आणि आचार संकुचित होणा-या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची गरज - तुषार गांधी यांचे मत

अंबाजोगाई -:
विचार आणि आचार संकुचित होणा-या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची गरज आहे असे मत गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
येथील वेणुताई चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उदघाटक म्हणून तुषार गांधी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रख्यात सिनेअभिनेते तथा चित्रपट व मालिकांचे दिग्दर्शक किरण माने होते. तर व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण
स्मृती समारोह समितीचे सचीव दगडु लोमटे, उपाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना तुषार गांधी म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्या सारखी माणसं होवून गेली का नाही अशी शंका निर्माण होणाऱ्या परिस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी अशा तीन दिवसीय समारोहाचे आयोजन करण्यात येते ही खुप समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत खुप महत्वाचा वाटा आहे. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी दिला. भारत चीन घ्या युद्धकाळात संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा ही त्यांनी उल.लेख केला.
आजच्या परिस्थितीत संपूर्ण देशभर संविधान विरोधी वातावरण निर्माण करण्याचे काम किमी जण जाणीवपूर्वक करीत आहेत अशा परिस्थितीत याविरुद्ध सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन तुषार गांधी यांनी केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रख्यात सिने अभिनेता दिग्दर्शक किरण माने यांनी आपल्या भाषणात किरण माने
यशवंतराव चव्हाण यांच्या अंत्यसंस्कारासाठी मला उपस्थित राहता आले हे माझं भाग्य. यशवंतराव चव्हाण हे गोरगरीब, शोषीत दलीत यांच्या उध्दारासाठी झटणारे नेते होते. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी देवराष्ट्र या गावात असपृशांसाठी शाळा महर्षी वि. रा. शिंदे यांच्या हस्ते सुरू केली.
यशवंतराव चव्हाण हे समाजकारणातुन राजकारणात आले. आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री, उपपंतप्रधान झाले. सत्तेचा कैफ आपल्या डोक्यात न जावू देणारा हा नेता होता.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा असला तरी निर्मितीनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत आपला काहीही सहभाग नाही हे ठासून सांगणारा हा नेता होता. यशवंतराव चव्हाण हे तरल संवेदनशीलता, समाजभान, गरीबांची जाण असलेला नेता होता. अशा या थोर माणसांच्या विचारांचा जागर होणार महाराष्ट्रातील अंबाजोगाई हे एकमेव गाव असल्याचा आपल्या अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी दीपप्रज्वलन व यशवंतराव चव्हाण, व स्व.भगवानराव लोमटे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रस्ताविक दगडू लोमटे यांनी केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत समितीचे सतीष लोमटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रा. मेघराज पवळे यांनी मानले.