माजी विद्यार्थी मेळाव्यातून कर्तव्य आणि कृतज्ञतेचा भाव जागृत होतो.- बिपीनजी क्षीरसागर

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
कर्तव्य आणि कृतज्ञता ही भारतीय संस्कृतीतील महत्वपूर्ण मूल्य आहेत.माजी विद्यार्थी मेळाव्यातून कर्तव्य आणि कृतज्ञतेचा भाव जागृत होतो असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक तथा रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह बिपीन क्षीरसागर यांनी केले.
भा.शि.प्र.संस्थेच्या पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त सन १९९५ ते २०२४ या २९ वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि.१५ नोव्हेंबर २०२४ शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आला होता.मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्षीरसागर यांनी नागरी कर्तव्य,सामाजिक समरसता,कुटुंब प्रबोधन,पर्यावरण संवर्धन आदी सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांनी जातीभेदा पलीकडे जाऊन स्वतःला समाजकार्यात झोकून द्यावे.तसेच स्वकर्तृत्वाच्या बळावर गावातील विद्यार्थी आणि गावकरी यांचे जगणे सुखकर व्हावे याकरिता माजी विद्यार्थ्यांना कर्तव्य आणि कृतज्ञतेची जाणीव या मेळाव्यातून करून दिली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री.खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक उन्मेश मातेकर,मुख्याध्यापक संजयराव विभूते,माजी सरपंच सुधाकरअण्णा निकम तसेच आजी-माजी शिक्षक लक्ष्मण काटे, राम काटे,अजय कुलकर्णी, श्रीमती.मंदोदरी करपे,सतीश बलुतकर उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवर व सर्व माजी विद्यार्थ्यांचे पुष्प आणि पुस्तिका देऊन विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
माजी विद्यार्थी संघटन प्रमुख ज्ञानेश मातेकर यांनी शाळा स्थापनेचा इतिहास आणि मेळावा आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
शाळेचे माजी विद्यार्थी आणि देशाचे जवाबदार नागरिक म्हणून रानबा होळकर, राहुल गुट्टे,बाळू पांचाळ, आबासाहेब निकम,कु.मयुरी शिंदे यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील हृदय आठवणींना उजाळा देत संस्था,शाळा आणि शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात उन्मेश मातेकर यांनी विद्यालयाच्या जडण-घडणीसाठी संस्था,शिक्षक,पालक यांच्या बरोबरीने माजी विद्यार्थ्यांनी देखील योगदान द्यावे आणि आपल्या अनुभवातून नवीन पिढीला मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
मेळाव्याच्या शेवटी मतदार जागृती अभियान अंतर्गत सर्व माजी विद्यार्थ्यांना आगामी निवडणुकीत आपण व आपल्या कुटुंबातील सदस्यांनी १००% मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे असे आवाहन करण्यात आले.
अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या मेळाव्याचे सूत्रसंचालन ज्ञानेश मातेकर, प्रास्ताविक नितीन चौधरी, आभार प्रदर्शन राकेश मोरे यांनी केले.या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विष्णू तेलंगे,श्रीमती प्रणिता धोंड,श्रीमती मिरा नागरगोजे,प्रकाश बोराडे, माणिक तेलंग,आनंद देशपांडे, या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.एकूण 67 विद्यार्थ्यांनी मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाची सांगता कल्याणमंत्राने करण्यात आली.