अंबाजोगाईत ४० वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह
२५, २६ व २७ नोव्हेंबर असे तीन दिवस भरगच्च कार्यक्रम

राज्यातील ख्यातनाम मान्यवरांची उपस्थिती
अंबाजोगाई :- येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने चाळीसावा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह (दि.२५,२६ व २७) नोव्हेंबर असा तीन दिवस यंदाही साजरा होत आहे.
बघता,बघता या समारोहाने चौथ्या दशकात पदार्पण केले आहे. वैविध्यपुर्ण, वैचारिक, वाङ्मयीन, सांगितीक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, कृषिविषयक प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यक्रम यात होणार आहेत.
उदघाटन व कवी संमेलन
सोमवारी (दि.२५) सायंकाळी ५.३० वाजता समारोहाचे उदघाटन प्रख्यात गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींचे पणतू तुषार अरुण गांधी यांच्या हस्ते होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
रात्री ८.३० वाजता कवी संमेलन होईल. अध्यक्षस्थानी ठाण्यांच्या ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार ह्या राहणार आहेत. सूत्रसंचालन अकोल्याचे सुप्रसिद्ध कवी गझलकार गोपाळ मापारी हे करणार आहेत. सुप्रसिध्द कवी डॉ. वृषाली किन्हाळकर (नांदेड), प्रा. सिसिलिया कार्व्हालो (वसई), संगिता बर्वे (पुणे), संजय चौधरी (नाशिक), बालाजी मदन इंगळे (उमरगा), रमजान मुल्ला- (सांगली), जयंत चावरे (यवतमाळ), पूजा भडांगे (बेळगाव), सुनिती लिमये (पुणे), बालाजी सुतार – वर्धा (अंबाजोगाई), नारायण पुरी ( छ्त्रपती संभाजीनगर) नितीन वरणकार – (शेगांव) व संजय आघाव (परळी) यांचा सहभाग राहणार आहे.
चित्रकला स्पर्धा व बाल आनंद मेळावा
मंगळवारी (दि.२६) सकाळी शालेय चित्रकला स्पर्धा होईल. यानिमित्त बालआनंद मेळावा होणार आहे. अध्यक्षस्थानी मुलांच्या आत्मबळ निर्माण करणारे राजेंद्र बहाळकर हे राहतील. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळ सराफ व आनंदवन वरोरा येथील धान्य रांगोळीकार चित्रकार प्रल्हाद ठक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यातच शालेय चित्रकला स्पर्धेचे परितोषिके वितरण होईल.
रात्री आठ वाजता सुगम संगीत होईल. मुंबईचे सुप्रसिद्ध सुफी व गझल गायिका पूजा गायतोंडे यांचा मराठी, उर्दू, हिंदी गझल गायनाचा ‘रंगरेझा’ हा कार्यक्रम होईल.
शेतकरी परिषद
बुधवारी (दि.२७) सकाळी १०.३० वाजता शेतकरी परिषद होईल. प्रयोगशील शेतकरी तथा कृषिभूषण विजय अण्णा बोराडे यांच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. “माझी शेती कार्य कांहीं अनुंभव” या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. धाराशिव सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. मोहनराव बी. पाटील हे “फळबाग पीक – लागवड पद्धती, संवर्धन व बाजारपेठ’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आवाड शिरपूरा येथील ऊस उत्पादक व अभ्यासक पांडुरंग आवाड हे “ऊस लागवड – स्वानुभव व शेतकऱ्याला झालेला फायदे”‘ या विषयावर बोलतील.
समारोप समारंभ व पुरस्कार वितरण
सायंकाळी साडेपाच वाजता समारोप समारंभ होईल. पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील अध्यक्षस्थानी राहतील. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले व राज्य आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच समारंभात कृषीभूषण विजय आण्णा बोराडे यांना (कृषी), प्रकाशक बाबा भांड यांना (साहित्य), पद्मश्री पंडीत सतीश व्यास यांना (संगीत) तुळजापूर येथील साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार प्राप्त देविदास सौदागर यांना (युवागौरव) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, रोख अकरा हजार रूपये, शाल, पुष्पहार असे आहे.
संतूर वादन व शास्त्रीय गायन
रात्री ठिक ८.३० वाजता शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत पंडीत शिवकुमार शर्मा यांचे शिष्य पद्मश्री सतीश व्यास यांचे संतूर वादन होईल. त्यांना तबल्यावर पंडीत आदित्य कल्याणपूर हे साथ करतील. त्यानंतर कोलकत्ता येथील प्रतिभावान शास्त्रीय संगीत गायक उस्ताद अर्शद अली खान यांचे गायन होईल. त्यांना पुणे येथील प्रसिद्ध तबलावादक प्रशांत पांडव व संवादिनीवर गंगाधर शिंदे हे साथ करतील.
कै.भगवानरावजी लोमटे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या समारोहाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य कमलाकर कांबळे, सहसचिव प्रा. सुधीर वैद्य, कोषाध्यक्ष सतिश लोमटे, सदस्य प्राचार्य प्रकाश प्रयाग, प्रा. शर्मिष्ठा लोमटे, प्रा.भगवान शिंदे, यांनी व इतर पदाधिकारी तसेच सल्लागार भगवानराव शिंदे बप्पा व राजपाल लोमटे यांनी केले आहे.