किराणा दुकानातून विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेले डिझेल जप्त
स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई

अंबाजोगाई :- स्थानीक गुन्हे शाखेमार्फत रात्रीची गस्त घालत असताना बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंबाजोगाई – पुस रोडवर असलेल्या एका किराणा दुकानातून विक्रीसाठी अवैधरित्या साठवून ठेवलेला 110 लिटरचा डिझेल साठा जप्त करण्यात आला. या दुकानामध्ये अल्पवयीन मुलगा असल्यामुळे पोलीस ठाणे बर्दापूर या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मोटारसायकलींची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. यासाठी स्थानीक गुन्हे शाखेने गस्त वाढविली असून या गस्तीच्या दरम्यान रात्री बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या अंबाजोगाई-पुस रोडवर एका किराणा दुकानावर अवैधरित्या विक्रीसाठी 110 लिटरचा डिझेल साठा जप्त करण्यात आला. डिझेलची किंमत 11 ते 12 हजार आहे.
डिझेलसाठा जप्त करत असताना या दुकानात अल्पवयीन बालक असल्यामुळे बाल न्याय मंडळाकडे हा गुन्हा नोंद करून तो वर्ग करण्यात आला आहे. ही कारवाई जिवनावश्यक वस्तू कायदा कलम 3/7 अन्वये करण्यात आला असून ही कारवाई पोलीस हवालदार विकास राठोड, पो.हे.कॉ. मारुती कांबळे, पो.हे.कॉ. बाळकृष्ण जायभाये, नितीन वडमो, विष्णू सानप यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.