उमेश मोहिते यांच्या ‘ खोडा ‘ या कथासंग्रहास कै.विश्वनाथ यादव कराड गुरुजी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

.. अंबाजोगाई : येथील प्रसिद्ध लेखक श्री.उमेश मोहिते यांच्या ‘ खोडा ‘ या कथासंग्रहाला शिरूर कासार येथील कै.विश्वनाथ यादव कराड गुरुजी राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा एकता फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.अनंत कराड यांनी केली आहे.या पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे असून या पुरस्काराचे वितरण येत्या शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दहिवंडी ता.शिरूर कासार जि.बीड येथे संपन्न होणाऱ्या ७ व्या एकता मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. लेखक श्री.उमेश मोहिते यांच्या सोबतच श्री.विवेक उगलमुगले ( नाशिक ) ,श्री.रामदास केदार ( उदगीर ) ,श्रीमती अलकनंदा घुगे – आंधळे ( संभाजीनगर ) , श्रीमती स्वाती कान्हेगावकर (नांदेड ) ,श्रीमती निर्मला शेवाळे ( मुंबई ) ,श्री.विठ्ठल खिलारी ( सातारा ) आणि श्री अरविंद कुंभार ( विजयपुरा , कर्नाटक ) यांनाही विविध वाङ्मयीन पुरस्कारांनी या संमेलनात गौरविण्यात येणार आहे.
कष्टकरी शेतकरी वर्गाच्या हाल अपेष्टा नि सुख- दुःखाचे चित्रण करणाऱ्या श्री.उमेश मोहितेंच्या ‘ खोडा ‘ या कथासंग्रहाला प्राप्त झालेला हा चौथा राज्यस्तरीय पुरस्कार असून यापूर्वी त्यांना विविध नामांकित संस्थांचे मानाचे ११ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.तसेच त्यांचे साहित्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आलेले असून त्यांची आतापर्यंत एकूण दहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.श्री.मोहितेंच्या या यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवाराकडून अभिनंदन होत आहे.