संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा

बीड: संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. बीडमधील या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले. या मोर्च्यात भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, मेहबूब शेख या मोर्चामध्ये सहभागी झाले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी भाषण करत लवकरात लवकर मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी केली. तसेच मी ओबीसी आहे, तरी म्हणतो या वाल्मिक कराडला आधी आत टाका, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं.
संदीप क्षीरसागर नेमकं काय म्हणाले?
विंडमिळच्या प्रकरणात वॉचमॅन हा बौद्ध आणि संतोष हा मराठा होता. वाल्मिक कराडचे गुंड तिथं गेल्यावर संतोष देशमुख तिथं गेले. जातीपातीच्या राजकारण करणाऱ्यांना हे सांगा…मी ओबीसी आहे तरी म्हणतो या वाल्मिक कराडला आधी आत टाका, असं संदीप क्षीरसागर म्हणाले. मी विरोधात असलो तरी मंचावर उपस्थित असलेले सुरेश धस भाजपमध्ये आहेत, प्रकाशदादा सोळंके अजित पवार गटात आहेत, तरी ते छाती ठोकून सांगतायत आता टाका…आज आमदार अभिमन्यू पवार तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. तरी अभिमन्यू पवारांना विषय कळताच पाठिंबा दिला, असं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं.
भाजपचे आमदार अभिमन्यू पवार काय म्हणाले?
कोपर्डीचे ज्या पद्धतीने मोर्चे निघाले, संतोष देशमुख हत्येविरोधात देखील राज्यभरात मोर्चे निघतील. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वाल्मिक कराड असो किंवा कोणीही असो, कितीही मोठा आरोपी असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे. या मोर्चाची दखल सरकारने घ्यावी, असं अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे- संदीप क्षीरसागर
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. सभागृहात ज्या पद्धतीने सुरेश अण्णा धस बोलले. अजून पाच मिनिटं बोलले, असते तर सभागृह रडलं असतं. मोर्चात हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि अठरा पगड जातींचे लोक माणूस म्हणून आलेले आहेत. या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अजून अटक नाही, त्याचा गुन्हा थेट संबंध लागतो तरी त्याचा नावं नाही, अशी टीकाही संदीप क्षीरसागर यांनी केली. वाल्मिक कराडला सारंक्षण धनंजय मुंडेचं असल्याचे बोलले जाते. वाल्मिक कराड अटक झाली पाहिजे. फास्ट ट्रॅकमध्ये केस चालली पाहिजे. जोपर्यंत तपास होतं नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी देखील संदीप क्षीरसागर यांनी केली.