बेकायदेशीर वाळू वाहतूक केल्याप्रकरणी दोघां विरुद्ध गुन्हा
अंबाजोगाई -: बेकायदेशीर व विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाळूची चोरटी वाहतूक करत असतांना दोन आरोपीविरुद्ध बर्दापूर पोलीसांनी कारवाई केली.
बर्दापूर पोलीस ठाण्यात सदर दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक विश्वनाथ यल्लाप्पा चलवदे राहणार टेंभुर्णी, तालुका अहमदपूर जिल्हा लातूर व गणपत लिंबाजी होळकर राहणार चिल्का, तालुका अहमदपूर जिल्हा लातूर असे आरोपींची नावे आहेत. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी सहा वाजता अंबाजोगाई तालुक्यातील उजनी पाटी येथे करण्यात आली. दरम्यान हायवा मधील पाच ब्रास वाळू किंमत पंचेवीस हजार रुपये व हायवा किंमत वीस लाख रुपये असा एकूण २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सध्या बर्दापूर पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध धरपकड सुरू केली असून परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाई करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव या घटनेचा तपास करीत आहेत.
