
अंबाजोगाई : अपर्णा कुलकर्णी यांच्या निरांजन कविता संग्रहाचा मुळाधार आई आहे. त्यांच्या नात्यांचा रेशमी बंध या कविता संग्रहातून कुटूंबातील नात्यांची गुंफण केल्याचे प्रतिपादन लेखिका विजया मारोतकर यांनी रविवारी येथे केले.
येथील अपर्णा कुलकर्णी यांच्या निरांजन व नात्यांचे रेशमी बंध आणि अश्विनी निवर्गी लिखित वनोदवारी व “सेवावृती मेजर” या पुस्तकांचे प्रकाशन येथे झाले. त्या प्रसंगी विजया मारोतकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डाॅ. सुरेश खुरसाळे होते. ज्येष्ठ साहित्यिक वेदकुमार वेदालंकार, सुनिता देशमुख, विजया क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने तिच्याकडे बघण्याचा वेगळा आयाम तयार झाला आहे. कविता ही ताजी असली पाहिजे, वाचकांना आवडली पाहिजे अशी अपेक्षाही विजया मारोतकर यांनी व्यक्त केली.
यानिमित्त क्षीरसागर कुटूंबातील मुलींनी आपल्या आईची प्रकाशित केलेल्या चारही पुस्तकाने ग्रंथ तुला केली. त्यावर बोलताना सुनिता देशमुख यांनी आईची पुजा म्हणजेच तुला आहे. मुलांना स्वीकारून त्यात सुधार करत, नवनिर्माण करणारी आई असते. अशी आईची महती त्यांनी सांगितली.
विजया क्षीरसागर यांनी माझी लेकरं लेखक झाली, माझ्या डोळ्याचे पारणे फिटले याचा आनंद व्यक्त केला. या प्रसंगी वेदकुमार वेदालंकार यांचा सत्कार झाला.
डाॅ. सुरेश खुरसाळे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. अपर्णा कुलकर्णी, अश्विनी निवर्गी, प्रा. पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डाॅ. सीमा पांडे यांनी प्रास्ताविक केले. भूषण क्षीरसागर यांनी आभार मानले. प्रा. एस. पी. कुलकर्णी, राम कुलकर्णी व कल्याण कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.