स्व.नाना पालकर हे राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणारे व्यक्तिमत्व – नंदकिशोर मुंदडा

अंबाजोगाई -:
स्व.नाना पालकर यांनी आयुष्यभर मनुष्य निर्मितीचे सर्वांत मोठे विधायक कार्य केले.
असे राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्व.नाना पालकर होय असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केले.
येथील खोलेश्वर महाविद्यालयात आयोजित स्व.नाना पालकर स्मृती आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटक म्हणून मुंदडा बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा.शि.प्र.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर होते. तर उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारिणी सदस्या वर्षा मुंडे, विष्णुपंत कुलकर्णी, स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह किरण कोदरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी, परीक्षक डॉ.सुनील राऊत, मुख्याध्यापिका स्वरूपा कुलकर्णी, बळीराम पुरी यांची उपस्थिती होती.
खोलेश्वर महाविद्यालयात स्व.नाना पालकर स्मृती आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हे या स्पर्धेचे ५४ वे वर्ष आहे. प्रारंभी सर्व मान्यवरांनी स्व.नाना पालकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व देवी सरस्वतीच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्ज्वलन केले. याप्रसंगी नंदिनी कुलकर्णी हिने इशस्तवन सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.रमेश गटकळ यांनी केले. वैयक्तिक पद्य नंदिनी कुलकर्णी हिने सादर केले. तर प्रा.वसंत गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. या स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, लातूर आदी ठिकाणांहून स्पर्धक सहभागी झाले होते.