११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात रंगणार अध्यक्ष बालाजी सुतार यांच्या साहित्यावरील परिसंवाद

अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
१४ आणि १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष
बालाजी सुतार यांच्या साहित्यावरील परिसंवाद चांगलाच रंगणार आहे.
मसाप शाखा अंबाजोगाईच्या वतीने प्रति दोन वर्षानंतर आयोजित करण्यात येणारे अंबाजोगाई साहित्य संमेलन यावर्षी १४ आणि १५ डिसेंबर रोजी येथील नगर परिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. या निमित्ताने संमेलनाचे अध्यक्ष प्रतिथयश साहित्यिक बालाजी सुतार यांच्या साहित्यावर ठेवण्यात आलेला १५ डिसेंबर रोजी चा परीसंवाद चांगलाच गाजणार आहे.
साहित्य संमेलनाच्या दुसरे दिवशी अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या प्रथेप्रमाणे संमेलनाचे अध्यक्ष यांच्या साहित्यावरील परीसंवादाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बालाजी सुतार यांच्या साहित्यावरील परिसंवाद १५ डिसेंबर रोजी दुपारी १ ते ३ या कालावधीत होणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार लेखक व विचारवंत अमर हबीब हे राहणार आहेत. तर या परिसंवादाचे संयोजन व सुत्रसंचालन प्रा. रमेश सोनवळकर हे करणार आहेत.
या परिसंवादात बालाजी सुतार यांनी लिहिलेल्या नाटकांवर अमृत महाजन, कथा या साहित्य प्रकारावर प्रा. शैला बरुरे, कवीता या साहित्य प्रकारावर अमर हबीब तर इतर साहित्य (संकीर्ण) या विषयावर पत्रकार श्रीकिशन काळे हे आपले भाष्य करणार आहेत. या परिसंवादाचा समारोप अमर हबीब हे करतील.
११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बालाजी सुतार हे महाराष्ट्रातील एक प्रगल्भ साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या साहित्यावर नाटकं, चित्रपट आणि लघुपट निघत आहेत. एक दर्जेदार आणि सकस साहित्यिक म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या साहित्यावरील हा परिसंवाद संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संमेलन अध्यक्षांच्या साहित्यावरील परिसंवादात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार, मसाप अध्यक्ष दगडू लोमटे, या परिसंवादाचे संयोजक प्रा. रमेश सोनवळकर आणि संयुक्त संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.