योगेश्वरी शिक्षण संस्थेने उभारले मराठवाड्यातील सर्वात मोठे तारांगण
खगोलशास्त्रीय गोष्टींचा थरारक अनुभव; ग्रामीण भागातून वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ घडविण्यासाठी संस्थेचा उपक्रम

अंबाजोगाई : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून श्री योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई संचालित पू. बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या तारांगण प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. प्रसिद्ध खगोलतज्ज्ञ हेमंत मोने आणि श्री. एल. के. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडणार आहे.
शंभर वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या योगेश्वरी शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे सरांच्या प्रेरणेतून साकारलेले हे तारांगण आज मराठवाड्यातील सर्वात मोठे तारांगण ठरणार आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अनोखी संधी -:
ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी आणि खगोलशास्त्राचा थेट अनुभव घ्यावा, यासाठी ही आधुनिक सुविधा उभारण्यात आली आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक हे तारांगण ८ मीटर व्यासाचे असून, एका वेळी ४० प्रेक्षकांची आसनव्यवस्था आहे. वातानुकूलित सुविधा, उत्कृष्ट ध्वनी आणि प्रकाशयोजना यामुळे विद्यार्थी आकाशगंगा, ग्रह, तारे, नक्षत्रे, कृत्रिम उपग्रह यांसारख्या खगोलशास्त्रीय गोष्टींचा थरारक अनुभव घेऊ शकतील. या तारांगणात
थ्री डी सिंगल फिश आय लेन्स
डिजीटल प्रोजेक्टर वापरण्यात आला असून, ५० हून अधिक खगोलशास्त्राशी संबंधित शो मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध असतील. विशेषतः बायोग्राफी ऑफ युनिवर्स हा प्रसिद्ध शो विद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरणार आहे.
लोकसहभागातून साकारलेला प्रकल्प -:
हा विज्ञानप्रकल्प २.५कोटी रुपये खर्चून, कोणत्याही शासकीय मदतीशिवाय केवळ लोकसहभाग आणि माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून साकारला आहे.
वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ घडविण्याचा उद्देश -:
पूर्वी तारांगणाचा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, हैदराबाद येथे जावे लागत असे, मात्र आता बीड जिल्ह्यातच अत्यंत माफक दरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या उपक्रमातून भविष्यात इस्रो आणि नासा मध्ये काम करणारे वैज्ञानिक घडावेत, हा संस्थेचा उद्देश आहे. या ऐतिहासिक विज्ञानप्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी केले आहे.