
अंबाजोगाई -:
केज विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून २० नोव्हेंबर रोजी ३ लाख ८७ हजार २२१ मतदार ४२० मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
केज विधानसभा निवडणुकीसाठी
२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदार संघातील हे मतदान अत्यंत शाततेत व्हावे, प्रत्येक वस्तीमधील राहणाऱ्या मतदाराला मतदानासाठी जास्त लांब चालत जावून मतदान करावे लागू नये म्हणून शक्यतो त्या त्या विभागात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडुन मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत.
केज विधानसभा मतदारसंघात एकुण ३ लाख ८७ हजार २२१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २ लाख २ हजार ६२० मतदार पुरुष आहेत, १ लाख ८४ हजार ५९५ स्त्री मतदार तर ८ मतदार हे तृतीय पंथी आहेत. यासर्व मतदारांसाठी ४२० मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व मतदान केंद्रावर ४२० पथके तैनात करण्यात आली आहेत. तर ४६ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.
या सर्व मतदान केंद्रावर ४२० सीयु मशीन, ४२० बीयु मशीन आणि ४२० वायव्हीवायएटी मशीन तयार ठेवण्यात आल्या आहेत. या पैकी काही मशीनमध्ये जर यदाकदाचित बिघाड झालाच तर त्या त्वरीत बदलुन देण्यासाठी ८२ सीयु मशीन, ८२ बीयु मशीन आणि ८२ वायव्हीवायएटी राखून ठेवण्यात आल्या आहेत. ४२० मतदान केंद्रापैकी २१० मतदान केंद्र हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहेत.या सर्व मतदान केंद्रावर मतदान साहित्य व कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर नेवून सोडणे व घेवून येणे या कामासाठी ८० बसेस तैनात करण्यात आल्या आहेत तर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी ४५ झोनल अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विलास तरंगे यांनी दिली आहे.