३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव
उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

दिव्यांग, व आजारी भाविकांना व्हीलचेअर द्वारे दर्शन
अंबाजोगाई -: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात सलग नऊ दिवस भजन, किर्तन, प्रवचन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार , विलास तरंगे सचिव अशोक लोमटे यांनी दिली.
महाराष्ट्राचे शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीच्या दसरा नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापना व महापूजा होणार आहे. दिव्यांगांसह व आजारी भाविक भक्तांना व्हीलचेअर द्वारे श्री. योगेश्वरीचे दर्शन घेता येणार आहे. ही सुविधा या वर्षी नव्याने देण्यात आली आहे.
तसेच देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात एकूण ५२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दररोज सकाळी नऊ आणि रात्री नऊ या वेळेत एकूण १८ महिला व पुरुष सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रथमोपचार व वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. भक्तांसाठी दुपारी १२ ते २ या वेळेत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दर्शनाची गर्दी टाळण्यासाठी पुरुषांना १५ मिनिटे, तर महिलांना अर्ध्या तासात दर्शन कसे मिळेल? याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
तसेच योगेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संगीत भजन, गायन कीर्तन, जगदंबेचा गोंधळ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना योगेश्वरी देवीचे दर्शन घेता येणार आहे.
योगेश्वरी देवीच्या मंदिर परिसरात ऑनलाइन दर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने दर्शनाची व्यवस्था पोलिस बंदोबस्तही तैनात असणार आहे.
