समाजाभिमुख विद्यार्थी हेच भारतीय लोकशाहीचे आधार असतील : कॉ. ऍड.अजयकुमार बुरांडे

अंबाजोगाई (प्रतिनिधी) नव्या पिढीला सामाजिक समस्या आणि दुःख यांची जाणीव झाली नाही तर भारतीय लोकशाहीचे भवितव्य धोक्यात येईल, समाजाभिमुख विद्यार्थी हाच लोकशाहीचा आधार असेल असे मत कॉ. अजयकुमार बुरांडे यांनी मांडले.
सांडेश्वर विद्यालय चनई तालुका अंबाजोगाई येथे गंगाधर आप्पा बुरांडे प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कॉम्रेड बुरांडे बोलत होते. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे आणि प्रा. योगेश सुरवसे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कॉम्रेड बुरांडे म्हणाले की, आज देशासमोर अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत याकडे दुर्लक्ष करून केवळ आत्मकेंद्रीत पिढी निर्माण झाली तर भारतीय लोकशाहीचे भविष्य अंधारात असेल म्हणून आपल्या भोवतीच दुःख, सामाजिक समस्या यांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, ज्वलंत प्रश्नावर त्यांनी रोखठोक भूमिका घ्यावी यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. आजची ही वैचारिक पेरणी पुढे भारतीय लोकशाहीचा आधार ठरावी अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी बोलताना डॉक्टर शंकर धपाटे यांनी विद्यार्थ्यांनी जिज्ञासू ,वैज्ञानिक दृष्टिकोन, नीतिमत्ता जपावी आणि प्रसंगी खंबीरपणे उभे राहावे देशाला नवे नेतृत्व निर्माण व्हावे असे मत मांडले. प्राध्यापक योगेश सुरवसे यांनी बोलण्यासाठी वाचन किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले, आलेले स्पर्धक मनात विचारांचे प्रचंड वादळ घेऊन आले आहेत त्यांना संधी दिल्याबद्दल त्यांनी संयोजकाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संयोजक गोदावरी विद्यालय मंजरथ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बिंदू मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले, या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. बीड जिल्ह्याचे माजी खासदार स्वातंत्र्यसेनानी कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. या स्पर्धेत माध्यमिक गटातून अनुक्रमे कु. सलगरे तेजस्विनी निळकंठ, जाधव तेजस्विनी शिवाजी, कसबे श्रुती संतोष, पांडे नंदिनी योगीराज, टिळे शर्वरी श्रीराम, म्हेत्रे स्नेहल संतोष आणि प्राथमिक गटातून अनुक्रमे राऊत स्वस्तिका दिनकर, अर्णव दत्तप्रसाद सारडा, सुरभी संतोष कसबे, वाघमारे आस्था राधाकृष्ण, साबळे श्रावणी महेश तसेच खुल्या गटातून अनुक्रमे शिंदे शिवकन्या नवनाथ, पायघर मोहिनी चंद्रशेखर, सोनवणे अभिजीत हनुमंत, पाटील आकांक्षा सुधीर, दरगड श्रावणी बालाप्रसाद या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय ,तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिसे पटकावली.
वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक एड. श्रीधरराव डिघोळे,ज्येष्ठ संचालक प्रा. सुभाषराव धुळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रेड्डी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दीक्षित सर आणि पवार सर यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र शिक्षण संस्थेतील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी नामांकित परीक्षकांनी अचूक परीक्षण केल्याबद्दल सर्व शिक्षक व पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. स्पर्धेत राज्यभरातील विविध शाळांमधून 282 स्पर्धक विद्यार्थी सहभागी होते त्याचबरोबर शिक्षक, पालक यांची उपस्थिती लक्षणीय होती.