राज्यस्तरीय तीन पदके प्राप्त करणाऱ्या खोलेश्वरच्या कु.साक्षी थाटकरची देशपातळीवर निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रजत पदक मिळविणाऱ्या खोलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु.साक्षी थाटकर या विद्यार्थिनीची देश पातळीवरील आसाम आणि झारखंड येथे होणाऱ्या तीन क्रीडा प्रकारात सहभागासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल कु.साक्षी थाटकर हिचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
कु.साक्षी थाटकर हिने मिळवलेल्या या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाईचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी तिला प्रोत्साहनपर रोख एकवीस हजार रूपये बक्षीस म्हणून दिले आहेत. डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक 8 ते 11 नोव्हेंबर 2024 दरम्यान संपन्न झाल्या. या स्पर्धेत खोलेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु.साक्षी भास्करराव थाटकर हिने 19 वर्षांखालील वयोगटात लांब उडी, तिहेरी उडी या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक (गोल्ड मेडल) तर 100 मीटर अडथळा स्पर्धा या क्रीडा प्रकारात रजत पदक (सिल्वर मेडल) प्राप्त केले आहे. राज्यस्तरीय अत्यंत चुरशीच्या या क्रीडा स्पर्धेत एकाच वेळी तीन पदके प्राप्त करणाऱ्या कु.साक्षीस देश पातळीवर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरीय नेतृत्व करत सहभागाची संधी प्राप्त होणार आहे. कठोर परिश्रम घेऊन नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या या यशस्वी विद्यार्थिनीचे भा.शि.प्र.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलुरकर, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष विजयराव वालवडकर, स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह किरण कोदरकर यांनी तिचे कौतुक करून तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भा.शि.प्र.संस्थेचे प्रशासकीय समन्वयक प्राध्यापक चंद्रकांत मुळे, भा.शि.प्र.संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाबुराव आडे, डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर, सौ.वर्षा मुंडे, अविनाश तळणीकर, अप्पाराव यादव तसेच इतर संस्था सदस्य व स्थानिक पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी, क्रीडा शिक्षक प्रा.डॉ.माणिकराव पोखरकर यांनी तिचे अभिनंदन करून तिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.