भक्तीचा महापूर….. पुर्णाहुती महापूजेने श्री योगेश्वरी नवरात्र महोत्सवाची सांगता
योगेश्वरी देवीच्या यात्रेलाही भाविकांची मोठी गर्दी

हजारो भाविकांनी घेतले योगेश्वरी देवीच्या पालखीचे दर्शन
अंबाजोगाई -: महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सांगता रविवारी दुपारी एक वाजता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. तहसीलदार विलास तरंगे व सौ. मयुरी तरंगे यांनी पुर्णाहुती व महापुजा केली. महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या होमात श्रीफळ टाकण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. महापुजेनंतर भाविकांच्या देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या.
आज योगेश्वरी देवीच्या भरलेल्या यात्रेला मोठी गर्दी झाली होती. तसेच रात्री निघालेल्या योगेश्वरी देवीच्या पालखीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत साजरा झाला. आज महोत्सवाची सांगता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. श्री. योगेश्वरी देवल कमेटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे व सौ. मयुरी तरंगे यांनी महापूजा करून पुर्णाहुती टाकली.
यावेळी देवल कमिटीचे सचिव प्रा.अशोक लोमटे, कोषाध्यक्ष शिरीष पांडे, विश्वस्त संजय भोसले,डॉ.संध्या जाधव,अमोल लोमटे,सतीश लोमटे, प्रवीण दामा,हंसराज देशमुख,राजपाल भोसले,मुख्य पुजारी सारंग पुजारी, योगेश्वरी देवीचे पुरोहित,मानकरी व भक्त उपस्थित होते. या पुर्णाहुतीनंतर आराध बसलेल्या महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आज योगेश्वरी देवीच्या यात्रेसाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली. अंबाजोगाई व पंचक्रोशीतील दर्शनासाठी भाविकांची मोठी संख्या मंदिर परिसरात झाल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा लागला. रात्री आठ वाजता योगेश्वरी देवीची पालखी मंदिरातून निघाली.
ही पालखी मंडीबाजार, भटगल्ली, जैनगल्ली, गौंड गल्ली, देशपांडे गल्ली, खडकपुरा मार्गे कुत्तरविहिरीवरून पालखी मंदिरात पोहचली. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. आराधी भजनीमंडळ, महिलांचे भजनी मंडळ, ढोलताशे, झांज पथक व शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेली विद्युत रोषणाई, घरासमोरील रांगोळ्या शहर वासियांचे लक्ष वेधणारी ठरली. यावेळी मंदिरात आराध बसलेल्या महिलांना देवल कमिटीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.