नियंत्रण सुटलेल्या टेम्पोने आराधी महिलेस चिरडले
अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिर परिसरातील दुर्घटना

L
अंबाजोगाई – येथील श्री योगेश्वरी देवी मंदिराच्या मुकुंदराज रोडवरील प्रवेशद्वाराजवळ बसलेल्या आराधी महिलेचा टेम्पोने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हि घटना बुधवारी (दि.२२) दुपारी घडली.
केसरबाई धोंडीराम जोगदंड (वय ६५, रा. परळी वेस, समता नगर, अंबाजोगाई) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केसरबाई बुधवारी दुपारी श्री योगेश्वरी देवी मंदिराच्या मुकुंदराज रोडवरील प्रवेशद्वाराजवळ बसल्या होत्या. यावेळी मंदिर परिसरात झालेल्या कार्यक्रमाच्या खुर्च्या व इतर साहित्य नेण्यासाठी टेम्पो (एमएच २८ बीबी ३२२७) आला होता. सामान भरून गेटच्या बाहेर जात असताना चालकाचे टेंपोवरील नियंत्रण सुटले व टेम्पो थेट केसरबाई जोगदंड यांच्या अंगावरून जाऊन भिंतीला धडकला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या केसरबाई जोगदंड यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने टेम्पो तिथेच सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.