दिनकर जोशी यांनी समाज शिक्षकाची भूमिका निभावली – फ.मु.शिंदे
दिनकर जोशी यांचा सेवा गौरव समारंभ

अंबाजोगाई – शिक्षक, कवी व पत्रकार अशा विविध अंगांनी काम करत दिनकर जोशी यांनी समाज शिक्षकाची भूमिका योग्य पणे निभावली. असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी फ.मु.शिंदे यांनी केले.
येथील योगेश्वरी नूतन विद्यालयातील शिक्षक दिनकर वासुदेवराव जोशी हे आपल्या २९ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या सेवा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी फ.मु.शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, सौ.संध्या दिनकर जोशी, संयोजन समितीचे प्रसाद चिक्षे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना फ.मु.शिंदे म्हणाले की, सामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांच्या जीवनाला प्रकाश मान करण्याचे काम दिनकर जोशी यांनी केले. आत्मियता व समर्पणाच्या भावनेतून त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रामाणिक पणे व निष्ठेने काम केले. म्हणूनच एका शिक्षकाचा गौरव समाजाकडून होतो. ही कृतज्ञतेची भावना फार मोठी आहे. ती नैतिकता आपल्या कार्यातून दिनकर जोशी यांनी जोपासली आहे. समाजामध्ये एक व्यक्ती, साहित्य, कला, पत्रकारीता व शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून गावचा लोकशिक्षक बनतो. ही भूमिका त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा गौरव आहे. असे सांगुन आपल्या आई या कवितेने त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना दिनकर जोशी म्हणाले की, महाराष्ट्रात वैभव संपन्न असणार्या अंबाजोगाई शहराने मला आपलस केलं. त्यामुळे या गावचे ऋण फेडता येणार नाही. माझे विद्यार्थी हेच माझे वैभव असल्याचे जोशी यांनी सांगितले.
अंबाजोगाई सारख्या शहरात येवून समाज घडविण्याचे काम दिनकर जोशी यांच्या माध्यमातून झाले आहे. शिस्तबद्ध शिक्षण ही शिक्षणाची परंपरा जोशी यांनी जोपासल्याचे नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की, अंबाजोगाई शहराची सांस्कृतिक व साहित्यीक चळवळ गतिमान करण्यासाठी दिनकर जोशी यांचे मोठे योगदान आहे. एक व्यक्ती म्हणून त्यांनी शहराच्या वातावरणाला दिलेली दिशा प्रेरणादायी असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दिनकर जोशी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सपत्नीक गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद चिक्षे यांनी केले. संचलन मंजुषा खडके यांनी तर उपस्थितांचे आभार सदानंद वालेकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर कराड, राजेसाहेब किर्दंत, रत्नाकर निकम, शंकर वरवडे यांनी परिश्रम घेतले.
२९ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार-:
दिनकर जोशी यांनी २९ वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे मौलिक कार्य केले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांनी २९ वर्षात घडविलेल्या २९ माजी विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.