बार्टीच्या वतीने ‘सामाजिक समता सप्ताह’ अंतर्गत मोरेवाडी येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

अंबाजोगाई प्रतिनिधी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे, अंतर्गत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह अंतर्गत समतादुत प्रकल्पाद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आंबेजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथे भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे बार्टीचे समतादूत जोशी व्यंकटेश यांनी भेट देऊन भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित सामाजिक सप्ताह अंतर्गत शाळेचे मुख्याध्यापक श्री. मिसाळ एम.आर. यांना संविधान उद्देशीका भेट देण्यात आली. तसेच इयत्ता ७ वी च्या वर्गात संविधान उद्देशिका वाचन व भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता ७ वी चे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी शाळेचे मु.अ. श्री. मिसाळ एम.आर. सर, युवा प्रशिक्षणार्थी भालेराव अश्विनी लिंबाजी व सर्व सहशिक्षक उपस्थित होते.
हा कार्यक्रम बार्टीचे महासंचालक, प्रकल्प अधिकारी समतादूत प्रकल्प जिल्हा, बीड यांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील समतादूत व्यंकटेश जोशी यांनी आयोजित केला होता.