वोन सोगच्या सुरबहार वादनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबाजोगाई :- येथील योगेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवानिमित्त मंगळवारी झालेल्या सुरबहार वादनास उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यास जगविख्यात पखावज वादक उध्दवबापू आपेगावकर यांच्या पखवाज वादनाने रंगत भरली होती. या नवीन तंतुवाद्यावरील राग ऐकण्यात मंत्रमुग्ध झाले होते. नवरात्र उत्सवात परदेशी पाहुण्यांचे शास्त्रीय वादनाची मैफल पहिलीच असावी, दक्षिण कोरियन वोग सोग यांनी ही संगीत सेवा सादर केली. त्यांना जगविख्यात उध्दव बापू आपेगावकर यांनी पखावजावर साथसंगत केली. योगेश्वरी देवल समितीचे पदाधिकारी, अशोकराव लोमटे, शिरीष पांडे व सतीश लोमटे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून सत्कार केला.
या संगीत मैफलीत वोग सोग यांचे सुरबहार वादन लक्षवेधी ठरले. तंतुवाद्या मधील अवघड अशा सुरबहार वाद्यावर त्यांनी प्रारंभी यमन राग आत्मविश्वासाने सादर केला. रागांग, तंतुवाद्यातील पायाभूत वादन वैशिष्ट्ये जसे आलाप, जोड, झाला, जमजमा आणि भावपूर्णता यांचे सर्वांकष संतुलित मिश्रण त्यांच्या सादरीकरणातून प्रगट झाले. सुरबहारला साथ करताना पंडित उद्धव बापू आपेगावकर यांनी पखवाजावर चौताल मध्ये सुरबहारला साजेशी अशी परिपूर्ण साथ केली. गंभीर नादाच्या मृदंग वाद्यावरही उद्धव बापूंची साथ सुरबहार वादनाला पोषक अशीच ठरली. मुळातच दमदार आवाजाच्या पखवाज वाद्यावरही त्यांनी कौशल्याने केलेली साथ अधिक लक्षवेधी ठरली.
यावेळी देवल समितीचे सचिव अशोक लोमटे, उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, वसंतराव मोरे यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी, शहरातील संगीत क्षेत्रातील गायक, वादक, संगीत रसिकांची उपस्थिती होती.